संवाद - १
मी कोण..? आत्तापर्यंत काय केलं…?? कसा जगलो..??? आज मागे वळून बघताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते; मी आत्तापर्यंत शिडाच्या होडीसारखं जगलो. जिकडे काळाचा वारा नेत गेला तिकडे मी जात गेलो. काही मिळवण्यासाठी प्रवाहाविरुद्ध तर सोडाच पण प्रवाहाच्या दिशेतसुद्धा मी काही विशेष प्रयत्न केलेले मला आठवत नाहीत. याला माझा स्थायीभावच जबाबदार असेल कदाचित. पण हे मात्र खरं की आजपर्यंत एखादी गोष्ट हवीच म्हणून मन कधी ईर्ष्येला पेटलंच नाही..ते सदोदित धुमसतंच राहिलं..आणि तसंच एक दिवस विझेलही..! आजपर्यंत जे जे मिळत गेलं ते ते घेत गेलो. जे नाही मिळालं ते मिळवण्याची आसही नाही बाळगली ! ना आजपर्यंत कुठच्या गोष्टीचा अट्टहास धरला, ना कुठची गोष्ट मिळवण्यासाठी संघर्ष केला. किंबहुना मला तर वाटतं बंड माझ्या पिंडातच नाही. अशा गोष्टी काही सवयीने किंवा मुद्दाम विकसित करून येत नाहीत. त्या रक्तात असायला लागतात. ’बंड’- अन्याया विरुद्ध, प्रवृत्ती विरुद्ध अथवा विचारशाही विरुद्ध ही आतमधून येतात; उत्स्फूर्तपणे! त्याच्यासाठी ना वैचारिक प्रगल्भता लागते ना सदसद्विवेकबुद्धी! लागते ती फक्त प्रबळ जिद्द आणि इच्छाशक्ती! मी ...